घरातच नियमांचे पालन करुन ईद साजरी

Foto
इस्लामिक कालगणणेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे विशेष महत्व आहे. सध्या कोरोनाचा सावट असल्यामुळे बकरी ईद साजरी करण्याला मर्यादा आल्या. मात्र नागरिकांनी घरातच नमाज अदा करून नियमांचे पालन करत ईद साजरी केली.

दरवर्षी बकरी ईद निमित्ताने नमाज अदा करून मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जात होते. दरवर्षी गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. तसेच एकमेकांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. परंतु यंदा कोरोनाचे सावट पसरल्याने संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मशीद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता भाविकांनी घरीच अदा केली. यावर्षी मुस्लिम बांधवांनी बकरी ईद अत्यंत साधेपणाने साजरी करुन प्रशासनाला सहकार्य केले. 
ना गले मिलना, ना हाथ मिलाना
दरवर्षी बकरी ईद च्या दिवशी नमाज अदा करून एकमेकांना गळा भेट घेऊन हाथ मिळून शुभेच्छा दिल्या जातात. परंतु यंदा असे काही झाले नाही. अत्यंत साध्या पध्दतीने बकरी ईद साजरी केली. कोरोनामुळे ' ना गले मिलना, ना हाथ मिलाना' ही संकल्पना समोर ठेवून घरातल्या घरात बकरी ईद साजरी केली. सकाळी सूर्य उगवल्यानंतर नमाज अदा करून एकमेकांना फोन करून, ईद चे संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या असल्याचे इस्लामिक अभ्यासक मिर्झा अब्दुल कय्युम यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले.